पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

22 October 2016

आधार .....

जखमी मनाला
खळखळून वाहयचं असतं
कुठं तरी मोकळी वाट
शोधायचं असतं.  
ओघळणारे अश्रू
थांबणार नसले…
तरी...
जगायचा आधार
पेलायचं असतं.
ऊन सावलीच्या खेळात
उभारायचं असतं
आशा निराशेच्या छायेत
वावरायचं असतं.
आदर्शाच्या आधारानं
वाढायचं असतं
वर वर आकाशाला
भिडायचं असतं.
- देविदास कोरे (लातूर )
मो. नं - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

27 June 2016

देविदास कोरे यांची मराठी विषय विभागीय कार्यशाळेसाठी निवड

Devidas Kore Pasport Calar Fotho.jpg


निलंगा:-                                                                                                                        

शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  दिनांक २९ व ३० जून २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथे होण्याऱ्या दोन दिवसीय विभागीय मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातून सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे यांची निवड झाली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर जि. औरंगाबाद या संस्थेमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर मराठी विषयाची ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातून देविदास कोरे यांची निवड झाल्याबद्दल श्री. शामागीर शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीपराव धुमाळ, लातूर विभागीय मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, निलंगा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, सचिव अजय मोरे, डॉ. राजेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस. एन. शिरमाळे, संजय कदम, पी. आर. रेड्डी, एच. बी. दिवे, एस. बी. परिहार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

23 June 2016

बहूजन उद्धारक : राजर्षी शाहू महाराज



इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख'  या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही  त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी  त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व  जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्‍साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे  (लातूर)

मुख्याध्यापक

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा

ता. निलंगा  जि. लातूर

मो. - 97 30 32 5000

Email:  devidaskore21@gmail.com

22 June 2016




जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निलंगा :-
सिंदीजवळगा (ता. निलंगा) येथील जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे सर्व प्रकार केले. प्रशालेतील सहशिक्षक एच. जी. दिवे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकारा संदर्भात सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास कोरे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. या वेळी  सर्व शिक्षक वविद्यार्थी उपस्थित होते.

20 June 2016

जयहिंद विद्यालयाचा १०० टक्के निकाल

निलंगा:-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील भाग्यश्री अनिल शेळके हिने ८४.०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच दिव्या रंगराव  धुमाळ हि ८३.२० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व प्रदीप अशोक फावडे याने ७९.६० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच दत्ता भिकाजी  हराळे याला ८९ टक्के तर गीता बालाजी धुमाळ हिला ७८.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  सात , प्रथम श्रेणीत बावीस  व द्वितीय श्रेणीत सात तर तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

12 May 2016

समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी

देशाच्या विकासात आणि पायाभरणीत शिक्षणाला अनन्य  साधारण महत्व  आहे. समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षण  प्रभावी साधन आहे. म्हणून समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण सध्याचे वास्तव यापेक्षा वेगळे  असून हे चित्र दुर्देवी आहे. शिक्षणामुळे या देशातील गरिबी ,दारिद्रय कमी होईल , विषमता नाहीशी होईल असे म्हंटले  जाते. पण स्वातंत्र्यानंतरच्या  साठ वर्षानंतरही हे सध्या झाले आहे का ? उलट गरिबी व दारिद्रयात भर पडत नाही का ? ही विषमता कमी होण्याऐवजी का वाढत आहे ? हे आज पर्यंतच्या शिक्षणाचे यश आहे की अपयश ? सर्वच क्षेत्राच्या मुळाशी शिक्षण असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

  • शिक्षणातील विषमता चिंताजनक:
     सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करणे बंधनकारक आहे. त्या नुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तशी सोय व कायदाही केला आहे.  वरील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यावर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. या दृष्टीने शासनाचे व्यापक प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीची विषम स्थिती दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे.समाजातील सर्वच घटकांचा समान विकास घडून येण्यासाठी समान व सारख्या शाळातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. पण सध्याच्या शिक्षणात यापेक्षा वेगळे चित्र आढळते. सर्वसाधारण पणे शहरातील नगरपरिषदा , महनगरपालिकांच्या शाळांत दीनदलित , मजूर ,कामगार व गरिबांची मुले शिकताना आढळतात. तर ग्रामीण भागात शेतकरी , शेतमजुरांची मुले जिल्हापरीषदांच्या शाळांत बहुसखेने शिकताना दिसून येतात.शैक्षणिक वातावरणा आभावी दारिद्रय व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. बिकट परिस्थितीमुळे ते महागड्या खाजगी शाळात , शहरात  जाऊन शिकू शकत नाहीत. त्यांना शिकवणी वर्ग लावणे ही शक्य होत नाही. याउलट धनिकांची मुल सर्व प्रकारच्या सुविधा असणाऱ्या शाळांत देणग्या देवून शिकताना आढळतात .त्यांना शिकवणी वर्ग  , शैक्षणिक साधने व सुख सुविधा आसतात. म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. डॉक्टर ,  इंजिनियर , वकील , प्राध्यापक व अन्य क्षेत्रात ते पुढे असतात. या स्पर्धेत काही अपवाद वगळता सर्वसामान्य गोरगरिबांची मुले तग धरू शकत नाहीत. त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर धनिक अधिक धनिक बनतो. आणि विषमता कमी होण्या ऐवजी वाढते. म्हणून शिक्षणातील विषमता थांबवून समाजातील सर्व घटकांना समान व एकसारखे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
  • शहरी व ग्रामीण  भागातील दरी कमी व्हावी:
     शहरी  व ग्रामीण भागातील शिक्षणात काही प्रमाणात फरक दिसून येतो. शहरी भागात दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक सुविधाही असतात. शिकवणीवर्गाची ही  सोय  असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा कल शहरी भागाकडे वाढताना दिसून येतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काही शाळा पुढे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत , तर काही शाळा मुला अभावी ओस पडत आहेत. खेड्यातील शाळांना मुलांचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांची मनधरणी  करून शिक्षकांना मुलांची जमवा जमवी करावी लागत आहे. आशी स्थिती का ? निर्माण होत आहे. याचे आत्मपरीक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी करणे आवशक आहे.शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी अधिक जागरूक पणे लक्ष देताना दिसून येतात. त्यांना शैक्षणिक सुविधा व  साधणे ही पुरविली जतात. मुलांच्या अभ्यासाकडे  लक्ष्य दिले जाते. पण खेड्यात मात्र या पेक्षा वेगळी स्थिती आढळते. खेड्यातील पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फारसे जागरूक दिसत नाहीत.मुलांत ही शिक्षणाविषयी गांभीर्य आढळत नाही. शहरांच्या तुलनेत शैक्षणिक सुविधांचा ही आभाव जाणवतो. खाजगी शिकवणीवर्ग ही  नसतात. बरयाचदा पालक मुलामुलींना घरगुती व मजूराअभावी  शेतातील कामे लावताना दिसून येतात. त्यामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी होते. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही कच्चा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व निकाल खालावताना आढळतो.पालकांची मुलांच्या शिक्षणाविषयी असणारी उदासिनता. व शिक्षणाकडे पहाण्याची मानसिकता तसेच बहुसंख्य पालकांचा आडणीपणा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न व समस्या  निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात शिक्षणात तफावत व फरक दिसून येतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच पालकांचा शहराकडे शिक्षणासाठी वाढणारा कल कांही अंशी कमी होईल. देशातील वाढती गरिबी व विषमता कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना , तळागाळातील दीनदलित कामगार व गोरगरीबांच्या मुलामुलींना सारख्या व समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरच समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सारख्या प्रमाणात विकास होऊ शकेल व शैक्षणिक विषमता कमी होण्यास मदत होईल.
- देविदास कोरे  (लातूर)
मो. न - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gamil.com.

09 September 2014

क्रिकेट सारख्या खेळातून समंजस व सांघिक भावना विकसित होते - देविदास कोरे

निलंगा:-
शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व असून क्रिकेट सारख्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती बरोबरच समंजस व सांघिक भावनेचा विकास होण्यास मदत होऊ शकते असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी व्यक्त केले. सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाच्या भव्य क्रीडामैदानावर निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन ता. नऊ मंगळवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुख्याध्यापक देविदास कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळातून क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रामेगावचे माजी चेअरमन शिवाजी शेळके, सुरेश धुमाळ, सी. व्ही. चव्हाण, एस. व्ही. शिंदे, एन. ए. सय्यद, आर. पी. तेलंग, जी. जी. जाधव, राहूल क्षीरसागर, एस. व्ही. तारे आदी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात तालूका क्रीडा संयोजक एस. व्ही. शिंदे यांनी निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट व मैदानी स्पर्धेचे ठिकाण जयहिंद विद्यालय हे असल्याचे सांगून १६ व १९ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धा अनुक्रमे ता. दहा व अकरा सप्टेंबर तर मैदानी स्पर्धा २२ व २३ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली व तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धांत सहभागी होण्याचे आव्हान केले.
आज पार पडलेल्या १४ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धेत जेवरी येथील जि. प. प्रा. शाळा, निलंगा येथील शिवाजी विद्यालय, प्रतिभाताई पवार आश्रम शाळा, सिंदीजवळगा येथील जयहिंद विद्यालय, व जाजनुर येथील जि. प. प्रा. शाळाच्या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांसाठी पंच म्हणून एस. व्ही. तारे, एस. व्ही. शिंदे एम. टी. जाधव काम पहात असून स्पर्धा यशस्वीतेसाठी एस. बी. परिहार, एस. व्ही, पवार, एस, व्ही. तारे, आष्ठुरे सर परिश्रम घेत आहेत.

18 August 2014

शालेय योगा विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुमित माने याची निवड

निलंगा :-
लातूर जिल्हा विभागीय क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन २०१४ - १५  या शेक्षणिक वर्षात क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या १४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय योगा क्रीडा स्पर्धेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेला विद्यार्थी  सुमित समिंदर माने याने लातूर जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे सहशिक्षक एस. बी. परिहार, एस. व्ही. पवार क्रीडा शिक्षक एस. व्ही. तारे यांनी त्याचे आभिनंदन केले आहे.

10 August 2014

राज्यघटनेत असलेल्या पण त्याची अंमलबजावणी केली जात नसलेल्या धनगरांच्या आरक्षणा संदर्भात कांही प्रश्न

नगर समाज आरक्षण अंमलबजावणी संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विविध मार्गांनी तीव्र आंदोलन करत आहे. पण सुस्त व सत्तेत मदमस्त असलेल्या सरकारकडून आरकक्षणाचा निर्णय चालढकल करून विलंब केला जात आहे त्या अनुषंगाने खालील प्रश्न निर्माण झाले असून या तीव्र प्रश्नांची सरकारकडूनत्वरीत उकल होऊन धनगर समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे.
०१) राज्य घटनेत धनगर - धनगड  समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असूनही गेल्या ६७ वर्षा      पासून र आणि ड चा शाब्दिक घोळ घालून त्याची अंमलबजावणी सरकार कडून का करण्यात आली नाही…?
०२) देशातील अन्य राज्यांनी एस. टी. आरक्षणाची आमलबजावणी करून धनगरांना न्याय दिला असताना पुरोगामीतत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र राज्यघतनेतील हाकाच्या आरक्षणा पासून धनगराना आजतागायत का…?  वंचित ठेवले आहे…?
०३) अज्ञानी जंगलात व रानावनात भटकंती करीत फिरणाऱ्या भोळ्या भाबड्या मुळ आदिवासी  धनगर समाजाला  फसवण्याचं हे षड्यंत्र नव्हे का …?
०४) परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मुळ आदिवासी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केलेला असूनही राज्यसरकार त्याच्या अंमलबजावणीची शिफारस केंद्र सरकारकडे का करत नाही…?
०५) हाक्काच्या आरक्षणा पासून धनगरांना वंचित ठेवण्याचे पातक सरकार का….? करत आहे…?
०६) आरक्षणा अभावी धनगरांच्या अनेक पिढ्या आजपर्यंत बरबाद झाल्या. त्याला कोण जबाबदार आहे…?
०७) सत्ता वंचितांना न्याय देण्यासाठी असते का….? का त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी असते…?
०८) न्याय व सनदशीर मार्गाने हे आंदोलन व लढा गेल्या ६७ वर्षापासून सुरु आहे. पण साधी न्याय मागणीही का मान्य केली जात नाही... ?
०९) गेल्या  ६७ वर्षापासून हा अन्याय होत असूनही तो आज पर्यंत मूकपणे धनगर समाजाने सहन केला हा संयम व ही सहनशिलता नव्हे का ….?
१०) या समाजाकडून आणखी किती संयम व सहनसिलता अपेक्षित आहे…?
११) लाखो धनगर समाजबांधवांनी पंढरपूर ते बारामती शांततेत व सनदशीर मार्गाने पदयात्रा काढली. सरकारचे लक्ष्य   वेधले….?
१२) अमरण नऊ  दिवसांचे उपोषण करण्यात आले. पण उपोशनकर्त्यांना भेटायला सरकारच्या कोणत्याही मंत्र्याना वेळ का ….? मिळाला नाही.…?
१३) चक्री उपोषण झाले अनेकांची तबीयत बिघडली  पण सरकारला त्याचीही साधी दाखल घ्यावीशी का…? वाटली नाही….?
१४) आख्खा महाराष्ट्र या आंदोलनाने ढवळून निघाला आहे. स्वातंत्र्या नंतर हा समाज पूर्णता एकवटला असून त्यांना आपल्याला न्याय हक्कापासून वंचित ठेवल्याची जाणीव झाली आहे. सर्वत्र हे आंदोलन सनदशीर मार्गाने  सुरु असतानाही सरकार वेळकाढू पणा का करत आहे ….? धनगरांच्या न्याय मागणीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही…?
१३) धनगरांचा राज्य घटनेत एस. टी. प्रवर्गात समावेश असूनही  गेल्या ६७ वर्षापासून त्याच्या आमलबजावणी ची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे कटकारस्थान का…?  केले जात आहे…?
१५) घटनेत नसलेले आरक्षण सरकार देऊ शेकते तर मग राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबाजावणी  करण्याची शिफारस सरकार का…? करत नाही….?
१६) धनगर समजाच्या आरक्षण अंमलबजावणी संदर्भात हा दुजाभाव नाही का….? सरकार आशी सापत्नभूमिका का घेत आहे….?
१७) जंगलात व रानावनात भटकंती करणारा धनगर समाज मुळातच सरळमार्गी, संयमी व सहनशील  आहे. हा आज पर्यंतचा इतिहास असून तसी नोंद इंग्रजांनी ग्याझेट  मध्ये सुद्धा केलेली असताना या समाजाच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लावून तमाम धनगर बांधवांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक का केला जात आहे...?
१८) धनगर  व आमच्या आदिवासी बांधवांत बुद्धिभेद व तेढ निर्माण करण्याचे  कुटील षड्यंत्र, कपट कारस्थान  व महा कुंभाड रचून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न का केला जात आहे….?               
सरकारने या संदर्भात लवकर निर्णय न घेता हा प्रश्न असाच ताटकळत, तापवत ठेवला व त्यामुळे तीव्र उद्रेकातून अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार आहे…?
कांही नगण्य अप्रिय अपवाद वगळता आजपर्यंत धनगर समाजाचे हे आंदोलन शांततामय व सनदशीर  मार्गानेच झाले आहे.राज्यघटनेने दिलेल्या न्याय हक्काची मागणी मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरु ठेवावे पण त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
- देविदास कोरे ( लातूर )
मो - 97 30 32 5000
Email : devidaskore21@gmail.com

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

नगर जमातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. जातीयवादी सरकार आकस व सूडबुद्धीने गेल्या साठ पासष्ठ वर्षापासून धनगर जमातीवर सातत्याने अन्याय करत आहे. हि अत्यंत निषेधार्य बाब आहे. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi, जम्मू-काश्मीर-(10) bakkarwal, झारखंड-(25) oran, dhangar (oraon), कर्नाटक-(28) kuruba, केरळ- (18) kurumbar, kurumban, मध्यप्रदेश-(35) oraon, dhanka, dhangad, महाराष्ट्र-(36) oraon, dhangad, ओडिसा-(53) oraon, dhangar, uran. आता याच अहवालाच्या हिंदी भाषांतरामध्ये dhangad हा शब्द कसा लिहिला आहे ते पाहू.
  • झारखंड-उरांव, धनगर, ओरांव; मध्यप्रदेश-ओरान, धांका, धंगाद;
  • महाराष्ट्र-ओरान, धनगर; ओडिसा-ओरांव, धनगर, उरान. यावरुन dhangad या इंग्रजी शब्दाचे मराठी किंवा हिंदी रुप धनगर असल्याचे स्पष्ट होते.
  • याव्यतिरिक्त धनगर हे विविध राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखले जातात.
  • उदा. गुजरात-रबारी, हि. प्रदेश-गड्डी, महाराष्ट्र, म. प्रदेश, ओडिसा, झारखंड, उ.प्रदेश- धनगर, कर्नाटक, आं.प्रदेश, तमिळनाडू, केरळ-कुरुब, कुरुम्बर. या सर्व जमातींचा समावेश त्या-त्या राज्यात अनु.जमातीत आहे. या सर्व जमातींचा व्यवसाय, दैवते, चालीरिती, परंपरा या समान आहेत. धनगरी ओव्या, गजी न्रुत्य, मेंढपाळ व्यवसाय हे समान धागे आढळतात. अगदी या विविध नावानी गुगल सर्च केले तरी या सर्व जाती धनगर (shepherd) असल्याचे दिसेल.
विविध घटनात्मक यंत्रणानीही वेळोवेळी धनगर आणि धनगड एकच असल्याचे अभिप्राय दिले आहेत. १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे." राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२). या सर्व बाबी पहाता धनगर आणि धनगड एकच असल्याचे दिसते.
  तरीही केवळ तांत्रिक दोषाचा बाऊ करुन आजपर्यंत धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले गेले. घटनेने धनगराना दिलेल्या सवलतींपासून त्याना वंचित ठेवणे म्हणजे घटनेशी द्रोह करणे होय.
- देविदास कोरे (लातूर )
मो - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com

23 June 2014

जयहिंद विद्यालया चा निकाल ९३.०२ टक्के

निलंगा:-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल ९३.०२ टक्के लागला आहे. विद्यालयातील कृष्णा संजीव सिरसल्ले याने ९०.६० टक्के गुण घेऊन केंद्रात दुसरा तर विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच वर्षा बालाजी धुमाळ हिने ८७. ४० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व वेष्णवी रंगराव धुमाळ हिने ८४. ८० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच ज्योती गंगाधर हराळे हिला ८४ टक्के तर आरती युवराज धुमाळ हिला ८३.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  दहा, प्रथम श्रेणीत आकरा व द्वितीय श्रेणीत एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
S 001.jpg
       
   कृष्णा सिरसल्ले            वर्षा धुमाळ             वेष्णवी धुमाळ          ज्योती हराळे           आरती धुमाळ
       ९०. ६०                    ८७. ४०                    ८४. ८०                 ८४. ००                   ८३. ८०

11 March 2014

सरकार सुस्त : गारपिटग्रस्त शेतकरी मात्र त्रस्त

वकाळी गारपिटीच्या जबर तडाख्याने मराठवाडयातील शेतकरी हवालदिल झाला असून निसर्गाच्या भीषण प्रकोपाने तो देशोधडीला लागला आहे. बिगर मोसमी आवकाळी पाऊस व गारपिटीच्या भीषण तांडवाने गेल्या आठ दहा दिवसापासून कहर केला असून लातूरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना निसर्गाच्या या भयानक प्रकोपाचा जबर फटका बसला आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपिटीने कधी नव्हे एवढी भयानक हानी झाली असून शेतकऱ्यांचे जीवन पुरते उध्वस्त झाले आहे. रबी पिकांची पुरती नासाडी होऊन ती जमीनदोस्त झाली आहेत. फळबागा झडून व फळे सडून गेली आहेत. आंब्यांचा मोहोर पुरता झडला आहे. ऊस भूईसपाट झाला आहे. तोडणी होऊन फुटवा झालेल्या ऊसाची पाने पूर्णपणे झडून केस विनचरल्यासारखी झाली आहेत.  हातातोंडला आलेली रबी ज्वारी, गहू, करडा, वटाणा, हरभरा, आदी पिके गारपिटीच्या जबर तडाख्याने मातीत गेली आहेत. विजेची खांबे व झाडे उन्मळून पडली आहेत.
शेतातील कडब्याच्या गंजी वादळी वाऱ्याने अस्ताव्यस्त उडून जाऊन भिजल्या असून कडबा जनावरांकरिता खाण्या योग्य राहिला नसल्याने चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचा आसरा नाहीसा झाला आहे. पशुधानाचीही जबर हानी झाली आहे. घरावरील पत्रे उडून गेली आहेत. मराठवाड्यात सुमारे आठ लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीशेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आसला तरी ही प्रचंड हानी व नासाडी सार्वत्रीक आहे त्यामुळे निश्चित आकडेवारी आणि नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे. वादळी वारे व आवकाळी पावसाचा कहर सुरूच असून शेतकरी भेदरलेल्या व धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.
पोटच्या पोरासारखं मोठ्या कष्टानं जपलेल्या पिकांची ही भयानक नासाडी पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. गेल्या आठ दहा दिवसातच होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्यावर खूप मोठे आस्मानी संकट कोसळले असून निसर्गाच्या या भीषण तांडवाने शेतकऱ्यांचे जीवनच गारद केले आहे.पण नेतेमंडळी मात्र लोकसभेच्या जागावाटप व निवडणुकीच्या रणधुमाळीत पुरते  व्यस्त असल्याचे दिसत आहे.
सत्ता प्राप्तीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कांही नेतेमंडळीना आता जाग आली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या आश्रुवर मतांची पोळी भाजण्याचा कुटील डाव आखला जाण्याची शक्यताही आहे. गारपिटग्रस्त भागाच्या पाहणीचे आता दवरे आखले जात आहेत. राज्यावर एवढी भीषण आपत्ती वोढवून आठ दहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दवरयासाठी वेळ मिळाला आहे
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून कमालीचा आक्रोश सुरु आहे पण सुस्तावलेल्या मायबाप सरकारच्या कानावर अद्याप हा टाहो पोहंचला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.निवडणूक कामात गुंतलेली सुस्त व मस्तवाल यंत्रणा आठ दहा दिवस उलटल्या नंतरही  पंचनामे करण्याच्याच  नवटंकित मश्गुल असल्याचे चित्र आहे. वास्तविक हे आतोनात झालेली हानी सार्वत्रिक असताना हाताचा कंकणाला आरशाची गरजच काय ? खुलेआम या प्रचंड आपत्तीची झळ सर्वच शेतकऱ्यांना बसल्याचे वास्तविक चित्र सर्वत्र आहे. मग असे असतानाही पंचनाम्याचा देखावा करून वेळकाढूपणा केला जात  असल्याने शेतकऱ्यांत कमालीची खदखद व उद्वेगाच्या भावना उमटत आहेत. आम्हाला कोणी वाली आहे का ? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
निवडणूकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या झालेल्या या वताहाती कडे कमालीचे दुर्लक्ष्य होत असल्याची भावना बळावत चालली आहे. संप मोर्चे काढणाऱ्या कार्मच्यारांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणारे सरकार शेतकऱ्यांची फरफट करत असल्याने  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही भीषण आपत्ती ओढवून आठ दहा दिवस उलटले तरी ही वस्तुस्थिती तातडीने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची व्यवस्था का करता येऊ शकली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वेळेवर मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आस लाऊन बसले आहेत.
अवकाळी गारपिटीच्या पावसाने हतबल होऊन रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांना वेळ निघून गेल्यावर मदत मिळण्यापेक्षा ती तातडीने त्यांच्या पदरात पडणे आवश्यक आहे. पण निवडणूक आयोगाची परवानगी व आचारसंहितेचा बाऊ करून वेळकाढूपणा सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वास्तविक पहाता मेटाकुटीला आलेल्या व भीषण परस्थितीला तोंड देत  असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट वीज बील, पिक कर्ज माफी व भरीव आर्थिक मदत त्वरीत देऊन दिलासा देणे व कोसळलेल्या या आपतीतीतून त्यांना बाहेर काढणे सध्याच्या परस्थितीत गरजेचे आहे.  
-  देविदास कोरे ( लातूर )
मो. नं. 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

12 February 2014

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा संपन्न

भारत स्काऊट गाईड लातूर जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कब- बुलबुल व स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आठ ते दहा फेबुरवारी दरम्यान सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सहभागी झालेल्या ४७ कब बुलबुल व स्काऊट गाईड संघाचे सुमारे एक हजार ते बाराशे विधार्थ्यांनसह स्काऊट गाईड शिक्षकांचे शनिवार दि. आठ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता जयहिंद विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आगमन होऊन संघ नोंदणी, तंबू उभारणी, व उद्घाटन कार्यक्रमाचा सराव झाला.                                
जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन नऊ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई येथील बी. सी. हंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर येथील महाराष्ट्र राज्य विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे विभाग प्रमुख सुभाष डुकरे, लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, उस्मनाबाद जिल्हा संघटन आयुक्त इरले, परभणी स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस सुधाकर आंदोले, लातूर स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकात साळुंके, लातूर जिल्हा मुख्यालय आयुक्त एल. एम. डुरे, श्रीमती जोती मंगलगे उपाध्यक्षा श्रीमती सुमित्रा सुडे, सुनिता आरळीकर, लातूर जिल्हा स्काऊट गाईडचे कोषाध्यक्ष ए. बी. बिडवे, सहायक जिल्हा आयुक्त एस. एन. सिरमाळे, सिंदीजवळग्याच्या सरपंच हिरकणबाई घोलप, माजी सरपंच गोविंद सिरसले, रामेगावचे माजी चेरमण शिवाजी शेळके, मुख्याध्यापक राजेश्वर पाटील, पांडुरंग रेड्डी, अभिमन्यू गट्टे, दवनगिरे सर, सय्यद सर, श्रीमती पाटील मडम, निलंगा तालुका क्रीडा प्रमुख शिंदे सर, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन समिती प्रमुख तथा जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे शाल श्रीफळ हार व गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.    
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळी कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचेही सादरीकरण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालय, लातूर येथील गोदावरीदेवी कन्या विद्यालय, तळीखेड येथील जिल्हा परिषद प्रशाला व अहमदपूर येथील विमलबाई देशमुख विद्यालयाच्या संघांनी केले.
लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील मेळाव्यांचा मागोवा घेऊन या मेळाव्यात सभागी झालेल्या सर्व स्काऊटर्सना जयहिंद विद्यालय प्रशासनाने आवशक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मेळावा आयोजन समिती प्रमुख देविदास कोरे यांनी हा जिल्हा मेळावा घेण्याचा योग शाळेला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करून केवळ चारपाच दिवसात या मेळाव्याची तयारी केल्याचे सांगितले व सर्व सहभागी शाळांच्या स्काऊट गाईड संघाना मेळाव्याच्या सुभेछा दिल्या. बी. सी. हंगे  कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई हे आपल्या मनोगतात म्हणाले, “ स्काऊट गाईड ही संस्काराची चळवळ असून आडीआडचणीना कसं सामोरं जायचं याचा वस्तूपाठच या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा रानावनात स्वतः तंबू उभारून तीन दिवस येथे राहत असताना येणारे अनुभव प्रत्यक्ष वास्तव जीवनाची ओळख करून देणारे असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे एकत्र येऊन मिळूनमिसळून राहत असतो आणि त्यातून एकोपा जपला जातो हे अत्यंत म्हत्वाचे आहे.”
अध्यक्षीय मनोगतात विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील म्हणाले, “ या मेळाव्यात मुलींची संख्या लक्षणीय असून ही अभिनंदनीय बाब आहे. वेगवेगळ्या शाळांच्या स्काऊट गाईड संघांनी जे गीत व न्रत्य सादर केले ते खरोखरच वाखंण्यायोग्य आहे. आपल्यातील सुप्त कलागुणांना आशा मेळाव्यातून वाव मिळतो व आपला सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. मेळाव्यात ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातूनही प्रेरणा व स्फूर्ती मिळते.” कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले या कार्यक्रमास मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळातून आलेले सुमारे बाराशे विद्यार्थी स्काऊट गाईड शिक्षक व  गावकरी उपस्थित होते.
नऊ फेबु रोजी सायंकाळी ठीक सात वाजता जयहिंद विद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेकोटी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकोटी पेटूवून भारत स्काऊट गाईडचे राष्ट्रीय आयुक्त भा.ई.नागराळे (दिल्ली) व लातूर जिल्हा मुख्य आयुक्त वसंतराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर सिंदीजवळगा येथील उपसरपंच दिवाकर सिरसले, शिवाजी शेळके, लिंबराज मगर, मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जयहिंद विद्यालयातील स्काऊट गाईड च्या मुलीनी हातात ज्योत घेऊन ज्योत से ज्योत जगावो हा नयनरम्य देखावा गीत सादर केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय आयुक्त भा. ई. नागराळे म्हणाले, “ या मेळाव्यातील स्काऊट गाईडरसचा उत्साह पाहून मी आनंदी झालो असून या ठिकाणी सुरु असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा या सर्वांनी इथले वातावरण भारावून गेले आहे. मला राष्ट्रीय आयुक्त म्हणून वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचा योग येतो पण लातूरचं डोळ्यात भरणारं वेगळेपण मात्र जाणवतं असे गोरवोद्गार काढून ते म्हणाले, “ स्काऊट गाईड मधून स्वत्वाची जाणीव विकसित होते त्याच बरोबर काटकसर, सहास,राष्ट्रीय एकात्मता, श्रम प्रतिष्ठा, सांघिक भावना आदी मुल्यांचा संस्कार आपल्या मनावर होतो. म्हणून स्काऊट गाईड ही चळवळ जात,धर्म,भाषा या पलीकडे जाऊन माणूसकीची शिकवण देणारी आहे. ती जगातील अनेक देशात सक्रिय पणे कार्यरत आहे.” या नंतर मेळाव्यात सहभागी ४७ संघांच्या गीत व न्रत्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी  विद्यार्थांनसह रामेगाव व सिंदीजवळगा येथील अबालवृद्ध उपस्थित होते.
सोमवार दिनांक दहा फेबु रोजी सकाळी नऊ वाजता सिंदीजवळगा येथे भव्य जनजागृती व शोभायात्रा काढण्यात आली.गावातील पदाधिकारी जेष्ठ नागरिक व अनेक मान्यवर यात सहभागी झाले होते.त्यात पर्यावरण संरक्षण, मुलींचे शिक्षण, या बरोबरच विवेकानंद, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले या व अन्य महापुरूषाच्या वेशभूषा परिधान  करून या जनजागृती फेरीत सुमारे बाराशे विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला.
या नंतर दुपारी एक वाजता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत साळुंखे, कोषाध्यक्ष ए.बी. बिडवे, सह्यक सचिव दिलीप धुमाळ, जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर, मुख्याध्यापक देविदास कोरे शिवाजी शेळके, सरपंच घोलप आदी मान्यवर व्यास्पीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळीही  कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचे विद्यार्थांनी सादरीकरण केले. स्काऊट गाईड कार्यालय व शाळेचा वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ, हार व स्काऊटचा स्कार्फ घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वंयपाक, चित्रकला स्पर्धा, बन्डपथक संचालन, शोभायात्रा देखावा, लेखी परीक्षा, शेकोटी कार्यक्रम न्रत्य व गीत गायन स्पर्धा इत्यादी बद्दल त्यांनी मान्यवरांना माहिती दिली.
लातूर विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर यांनी पुढील वर्षी विभागीय मेळावा होणार असल्याची माहिती देऊन जिल्हा परिषदेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या नंतर जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख देविदास कोरे आपल्या  मनोगतात म्हणाले, “ मेळावा स्थळी सर्वांना आवश्यक त्या सोई सुविधां उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून  सर्व विद्यार्थी व स्काऊट गाईड शिक्षकांना मेळावा येशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. तसेच विद्यालयत येण्यासाठी आर्धा किलोमीटर रस्ता कच्चा व खराब असल्याची बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे गुरुजींच्या कानावर घातली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे आपल्या मनोगतात म्हणाले, “ आपण सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा तालुक्यातून या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलात. या विद्यालयाच्या भव्य पटांगणात मेळाव्याच्या निमित्ताने खूप कमी कालावधीत शक्य त्या सुविधा आपणास उपलब्ध करून दिल्या त्या खरोखरच स्तुत्य आहेत. आपण सर्वजण या मेळाव्यात एकमेकत मळून मिसळून राहिलात, आपल्यात विचारांची देवाण घेवाण झाली. नवीन ओळखी व मित्र मिळाले. नव्या जाणीवा, नवी प्रेरणा, चेतन्य निर्माण होऊ शकले. स्वत्वाची जाणीव झाली. आपली कामे आपणच करायची हा संस्कारही झाला. जीवनाच्या वास्तवतेची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हि अत्यंत महत्वाची अनुभूती आपणास या तीन दिवसाच्या मेळाव्यातून मिळाली. असे सांगून त्यांनी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या शाळांच्या संघांचे कोतूक करून त्यांना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दिलीप धुमाळ यांनीही आपले विचार मांडले.
यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी अध्यक्षीय समारोपात म्हणाले, “ ऐक्य व संघटन हे आपल्या देशाचे बळ व सामर्थ्य आहे. म्हणून स्काऊट ही चळवळ त्यासाठी कटीबद्ध होऊन काम करणारी चळवळ आहे. स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची मोहीम राबवावी. जर आपल्या गावचे पाणी आपल्याच गावात आडवून जिरवले तर पाण्याची समस्या कांही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते.आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे स्काऊट गाईडस आहात. जे स्वतः काम करतात त्यांना परमेश्वर मदत करतो. या चळवळीच्या माध्यमातून आपण भावी तरुणांनी देशातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध होऊन व एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शाळेसाठी अर्ध्या किलोमीटरचा रस्ता  पक्का करण्याचा प्रश्न मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी मांडला तो मुलांच्या सोईसाठी निश्चित पणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, व सरपंचांनी या बाबतीत लक्ष्य घालून तात्काळ जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा. तो मंजूर करून रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, जिल्हापरिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी व मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या स्काऊट गाईड संघाना कार्यालयाच्या वतीने शिल्ड, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे, सहशिक्षक सुधाकर परिहार, सुनील तारे, शिशिर पवार, शुभांगी कामशेट्टी, बळवंत पाटील, सुरेश धुमाळ, ताहेर शेख, वामनराव सुरवसे, सेवक रावसाहेब कोरे,विलास पांढरे, धर्मा लांडगे, यांचा कार्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले. शेवटी सामुहिक राष्ट्रगीत होऊन तीन दिवसीय स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याची सांगता झाली.                                                      
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जिल्हा. लातूर.
मो. नं- 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com

07 July 2013

महागाईने जनता त्रस्त सरकार मात्र सुस्त

गेल्या दोन आडीच वर्षापासून महागाई सतत वाढत आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे असाह्य होत आहे. गोरगरीबानी जगावे कसे ? हा जीवघेणा प्रश्न बनत आहे. वाढत्या महागाईमुळे लोक हतबल होत आहेत. आगोदरच  महागाईच्या झळा सोसून हयराण झालेल्या मध्यमवर्गीय जनतेसमोर पुन्हा  एकदा महागाईचा आगडोंब भडकण्याची चिन्हे सतत जाणवत आहेत.
अलीकडेच कांही दिवसापूर्वी पेट्रोल, डीझेल व घरगुती वापराच्या ग्यासच्या दारात वाढ झालेली आहे. वर्चेवर त्यात आणखी भर पडत आहे.  त्यामुळे आगोदरच वाढत्या महगाईला तोंड देत जगत असलेल्या जनतेला सतत वाढणाऱ्या महागाईला तोंड देत जगणे असाह्य होत आहे. महगाईने त्रासून गेलेल्या जनतेत कॉंग्रेस युपिए सरकारविषयी प्रचंड नाराजी व रोष निर्माण होत आहे.
वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकार का अपयशी ठरत आहे ? महागाई कमी होण्या ऐवजी त्यात आणखी का भर पडत आहे ? याला सरकारची धोरणेच कारणीभूत नाहीत का ? वाढत्या महागाईच्या झळा जनतेनी किती सहन करायच्या ? असे भयावह प्रश्न निर्माण होत आहेत.
भारत पेट्रोलियम , हिंदुस्तान पेट्रोलियम , इंडियन ऑईल या देशातील प्रमुख तेल कंपन्या अधूनमधून तेलाच्या दरात दरात वाढ करत असतात. त्यामुळे त्याचा देनंदिन व्यवहारावर परिणाम होवून अन्य जीवना- वश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. महागाईत भर पडून पुन्हा हा आलेख वाढतच आहे. त्यामुळे सामान्य  जनतेच्या खिशाला कात्री लागून महागाईचे  चटके  बसत आहेत. हि खेदाची बाब आह.
आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या कांही काळापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे परिणामतः कच्या तेलाचे दर स्थिर नाहीत.  त्यात सतत चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम इंधन दर वाढीत होत आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. इराण हा कच्या तेलाचा प्रमुख पुरवठादार देश आहे. भारत एकूण तेलाच्या साधारणतः बारा टक्के कच्चे तेल इराण कडून आयात करतो. जर इराणने कच्या तेलाचे दर आणखी वाढवले तर इंधन दरवाढ अटळ  ठरू शकते. असे झाले तर मध्यमवर्गीय जनतेला पुन्हा वाढत्या महागाईचे चटके सहन करावे लागणार असून ते कठीण जाणार आहे. आगोदरच महागाईने हयराण झालेली जनता आणखी हतबल होऊन खिशाला बसणारा हा  चाट सहन करू शकणार नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाढत्या महागाईने आता मर्यादा ओलांडली आहे. त्यात आणखी भर पडल्यास सामान्य जनतेला ते असाह्य होणार आहे. म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वेळीच त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्याची आवश्यकता प्राकर्षाने निर्माण झाली आहे.
-  देविदास कोरे ( लातूर )
  मो. 97 30 32 5000
 Email: devidaskore21@gmail.com