पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

27 December 2016

अल्प परिचय
नाव :- देविदास नामदेवराव कोरे
शैक्षणिक पात्रता:-  [एम. ए. बी. एड.]
पद:- मुख्याध्यापक
अनुभव:- १६ वर्ष
कार्यरत शाळा:-  जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा तालुका निलंगा जिल्हा लातूर
लेखन:- राज्यातील विविध वर्तमान पत्र व मासिकातून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयावरील अनेक लेख व कविता प्रकाशित. अंकुर सुविचार संग्रह, यशोदीप मराठी निबंध लेखन व व्याकरण इयत्ता १० वी सराव पुस्तिका इत्यादी पुस्तके प्रकाशित.
सन्मान:- सामाजिक संस्थांचे जिल्हा व राज्यस्तरावरील कांही पुरस्कार प्राप्त.
छंद :- वाचन, मनन, चिंतन तथा लेखन. सामाजिक बांधिलकीतून समाज कार्यात सहभाग.
ब्लॉग:- devidaskore.blogspot.in या ब्लॉग वर विविध विषयावरील लेख प्रकाशित.

संपर्क नंबर:- 9730325000/9420869000  

20 November 2016

मूल्यशिक्षण : दशा व दिशा

मूल्यशिक्षण  हा शिक्षणाचा मूलाधार आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा. समाजाचा  नेतिक स्तर उंचावा म्हणून प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते १९८६ च्या राष्ट्रीय शेक्षणिक धोरणापर्यंत चारित्र्य संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. १९६४ मध्ये शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या शिक्षण आयोगात डॉ. कोठारी यांनी नेतिक मुल्यांची जोपासना हे शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट  मानले.
   माणसाला स्वताचे माणूसपण शिक्षणातून गवसले पाहिजे. विद्यार्थ्याचे मन, शरीर व आत्मा या त्रीयी मध्ये जे सुप्त उतमत्व आहे. त्याचा सर्वांगीण विकास घडवणं, शिलवान, चारित्र्य संपन्न,संस्कारक्षम पिढी निर्माण कारण या दृष्टीकोनातून उद्याचा आदर्श भारत आजच्या शालेय वर्गातून घडला पाहिजे. ही महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सर्वकष अपेक्षा होती. पण ती आजच्या शिक्षणातून सध्या होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे. मानवी जीवनाच्या  बॊद्धिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भोतिक, सोदर्यविषयक व सांकृतिक अंगाबाबत जे उत्कृष्ट नेतिक व समाजमान्य आहेत. ती मुल्य विद्यार्थ्यात संक्रमित झाली पाहिजेत. व्यक्तीचं अंतर्बाह्य जीवन सुखी, शांत, समाधानी, विकसित व उन्नत व्हावं, सत्य, सुंदर, हि मुल्य मनात रुजावीत हे मुल्य शिक्षणाचं व्यापक उद्धिष्ट आहे. व्यक्तिगत, सामाजिक, व राष्ट्रीय मुल्य विद्यार्थ्यात अनओपचारिक शिक्षणातून संस्करीत होणे आपेक्षित आहे.मूल्य ही अमूर्त संकल्पना आहे. सुसंस्कारित व्यक्तीच्या आचार विचारातून मूल्य व्यक्त होतात. प्रत्यक्ष आचरणातून मूल्यांचे संरक्षण, जतन संवर्धन व संक्रमण होत असते. सुसंस्कासंपन्न व्यक्तिमत्व हा मूल्यशिक्षणाचा उद्देश आहे. या दृष्टीने मूल्यशिक्षण व्यक्तित्व विकासाचे साधन आहे.
माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगावा हे महत्वाचे आहे. म्हणून मूल्याशिक्षणाचा हेतू व्यापक आहे.पण आज शाळांत दिल्या जाणाऱ्या मूल्यशिक्षणातून तो सफल होत आहे का ? स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वेज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुभाव, अहींसा, मानवता, शिस्त, संवेदनशीलता, न्यायप्रियता, सोजन्य, सहिष्णूता, खिलाडूवृत्ती, सर्वसमभाव, परस्पर सहकार्य, आदरभाव, राष्ट्रीय एकात्मता, आदी मूल्यापेकी किती मूल्य सध्या दिल्या जाणाऱ्या मूल्याशिक्षणातून विद्यार्थ्यात संस्कारीत संक्रमित होत आहेत ?  शांतता,  सामंजश्य, सहानभूती, सरह्दयता, या प्रवृत्ती विद्यार्थ्यात जोपासल्या जात आहेत का ? वर्तन, शील, चारित्र्य, त्याग, सारासार विवेक, समतोल दृष्टी, निरपेक्ष वृत्ती, हे व्यक्तिमत्वाचे पेलू विकसित होत आहेत का ? मूल्यशिक्षणातून किती विद्यार्थ्यात आत्मभानाची जाणीव विकसित होत आहे.
गुरुजन वाडीलधारी माणसं याना आजच्या विद्यार्थ्याकडून मान आदर मिळतो का ? नसेल तर आशी परिस्थिती का निर्माण व्हावी याला जबाबदार असलेल्या घटकांनी आत्मशोध घेणे आवश्यक नाही का ? सध्या मूल्यशिक्षण शाळांमधून कर्तव्यनिष्ठेने, व प्रभावीपणे दिले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत हि वस्तविकता प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण मूल्यही का संस्कारित करू शकलो नाही. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
समाजात अस्थिरता, अशांतता, अविश्वास, स्वार्थ, लाचारी, धर्मांधता, कटुता द्वेश, भ्रष्टाचार, तिरस्कार, अनाचार, या दुष्प्रवृत्ती फोफावत आहेत. माया स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, सरह्द्यता,सहानभूती, व मानवता संपत आहे. शिस्त, ज्ञान, शील, प्रामाणीकपणा चारित्र्य याला  गोणत्त्व येत आहे.
झटपट श्रीमंत कसे होता येईल ? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. यातूनच समाजविघातक हिंसक प्रवृत्ती बळावत आहेत. समाजाचा नेतिक स्तर खालावत आहे. त्याग, तत्त्वनिष्ठा, सहिष्णूता,सत्य, सदाचरण, इत्यादी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. बेईमानी, फुटीरता, कट्टर धार्मिकता, संकुचित प्रादेशिकता जातीयता, भ्रष्टाचार, चंगळवाद बोकाळला आहे. उबग आणणारं सत्तापिपासू राजकारण ,केबल, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून होत असलेले मूल्यहीन संस्कार या अनेकविध समाजविघातक अनिष्ट प्रवृत्तींचा कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम बालवयातील संस्कारक्षम मुलांवर होणे अपरिहार्य आहे. समाजव्यवस्थाच आशा अपप्रवृत्तीत रुतत चालली असल्याने प्राचीन भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांना तडे जात आहेत.
समाज परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य मूल्यशिक्षणात असलं तरी सध्या शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्याला पुरती बाजारू अवकळा आली आहे. शिक्षणा विषयी काडीचीही आस्था नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. शेक्षणिक दुरदृष्ठीचा आभाव, ध्येयवादाचा दुष्काळ, प्रवेशातील भ्रष्टाचार बिनबोभाट सुरु आहे. निकाल वृद्धीसाठी आनिष्ट् मार्ग आवलबण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिक्षण क्षेत्राचं हे चित्र निराशाजनक आहे.
शाळांतून जे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना देणं, रुजवणं, संक्रमित  तथा संस्कारित होणं अभिप्रेत आहे. त्यालाच भ्रष्ट शिक्षण प्रक्रियेत  तिलांजली मिळत आहे. परिणामत: मूल्यशिक्षणाची दिशा व दशा खालावत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मूल्यशिक्षणाची आशी स्थिती व्हावी ही एक प्रकारची शोकांतिकाच नव्हे का ? आजच्या शिक्षणातून माणूस घडत आहे कि बिघडत आहे.? आस प्रश्न निर्माण होत आहे. शिकलेली मुलं बंद, मोर्चे, लुटालूट, जाळपोळ,,  मोडतोड आशी हिंसक कृत्य करतात. समाजविघातक प्रवृत्ती, लाचलुचपत, व्यासनांधता, बेजबाबदारी, झुंडशाही, अविवेक, विध्वंसक प्रवृत्ती इत्यादी आजच्या शिक्षण व्यवस्थेची कटू अपत्यच नव्हेत का ? या बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मुळात शिक्षणाचा संबंध आचार विचार व वर्तनाशी आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य सुसंस्कारित व्हावीत या दृष्ठीने विचार व आचारात साम्य  पाहिजे. खरं म्हणजे घर हीच पहिली संस्कार शाळा आहे. म्हणून घराघरातून सोख्य, प्रेम,दया, त्याग, सत्य, नम्रता, सदभाव, राष्ट्रभक्ती इत्यादी सद्गुणांची जपणूक वडिलधाऱ्या व्यक्तींच्या विचार आचारातून होणे आवश्यक आहे.
बालवयात झालेले संस्कारमूल्य चिरकाल टिकून राहतात. म्हणून कुटूंब व शाळांतून सुसंस्कारासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील संकटं आवाहनं पेलण्याचं सामर्थ्य व बळ मुलांना सुसंस्कारातून लाभत लाभत असते. त्यामुळे मुलांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीकडे माता,पिता,कुटूंब, समाज, शाळा व गुरुजनांकडून जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच योग्य वयात विध्यार्थ्यात अक्षर जीवन मूल्यांचे बीजारोपण होऊन मूल्यशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो.
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता.  निलंगा जि. लातूर
मो. नं -97 30 32 5000
Email ID: devidaskore21@gmail.com

18 November 2016

शिक्षकांच्या मानगुटीवर सेल्फीचा खुळ खुळा

लीकडे शिक्षण क्षेत्रात दिवसागणिक नव नवीन प्रयोग सुरू आहेत. ते आता शिक्षकांच्याही अंगवळणी पडत आहेत. एखाद्या दिवशी शिक्षण खात्याचा नवीन नियम वाचण्यात आला नाही अथवा कानावर पडला नाही तर शिक्षकांना ओशाळल्यासारखे होऊन आज कालचा जुनाच दिवस आहे की काय ? असा भाबडा भ्रम होतो ! ही सध्याच्या शिक्षणक्षेत्रातील वास्तविकता आहे. ती कशी नाकारता येईल ?
शिक्षणाच्या आयचा घो होय ! आता असे म्हणायचीच स्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाली आहे. तीन नोव्हेंबर २०१६
रोजी स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या वर्गातील मुलांची उपस्थिती पडताळण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलांचे दहा दहा चे गट करून त्यांची सेल्फी काढावी. या सेल्फी मध्ये असलेल्या मुलांची नावे आणि आधार क्रमांकासह हे सेल्फी फोटो शिक्षण खात्याच्या सरल वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायवे. असे निर्देश या शासनादेशात देण्यात आले आहेत.
राज्यातील कांही शाळांमध्ये दोन हजारांपेक्क्षाही अधिक विध्यार्थी संख्या आहे. दहा दहा च्या गटात वर्ग शिक्षकांने मुलांसोबत सेल्फी काढायची म्हंटले तर दिवस तरी पुरेल का ? हे काढलेले सेल्फीचे फोटो ऑनलाईन अपलोड कराचे ! खेड्यापाड्यातील किती शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहेत? जलदगती इंटरनेट ची सुविधा वस्ती, पाडे, तांडे व खेड्यातील शाळांमध्ये आहे का ? कांही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत तर बहुतांश शाळांत पुरेशा संख्येत शिक्षक नाहीत. या वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता शिक्षण खात्याने  अफलातून निर्णय घेवून शिक्षकांच्या हाती मात्र सेल्फीचा खुळ खुळा दिला आहे. आता दीपावली सुट्ट्या संपून जिल्याहातील शाळा २१ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. खेड्यातील शाळांमध्ये सुरवातीचे तीन चार दिवस मुलांची उपस्थिती नगण्य असते. सुरवातीच्या आठवड्यात शाळेचे तोंड न पाहणाऱ्या मुलांना शाळेत आणून सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ निर्माण झाली आहे.
शिक्षकांची नेमणूक नेमकी कशासाठी आहे ? असा प्रश्न आता प्रामुख्याने निर्माण झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून ही व अशीच अन्य कामे करायची का ? वर्गात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले कशी शिकतील ? ती प्रगत होतील का ? शिक्षकांना आशा कामात जर गुंतवून ठेवले तर शाळा कशा प्रगत होतील ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून हा निर्णय अव्यवहार्य असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू गुंडाळून ठेवून वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता सेल्फी सारखे निर्णय होत असतील तर ही खेदाची बाब आहे.
देविदास कोरे
(लेखक, जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथे मुख्याध्यापक आहेत.)
पूर्व प्रसिद्धी -  दै. ‘पुण्यनगरी’ दि. १७ नोव्हें २०१६

10 November 2016

माती…… ( Kavita )

मी
हातातले
मोती
फेकून दिले.
अन ….
हातात
माती घेतली
मोत्या पेक्षा
मातीच
मला
मोलाची वाटली.
ती
मुठभर माती
मला
जगण्याचं बळ
वाटली.
त्या
मातीचा
वास
मला
परिचित होता.
बापाने
आयुष्यभर
गाळलेल्या
घामाचाच
तिला
गंध होता.
ती माती
मीतसाच
न्याहाळीत होतो
आयुष्य माझं
तिच्या
स्रजनक्षमतेत
उलगडत….
शोधत….
होतो.
- देविदास कोरे ( लातूर )
MO - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

22 October 2016

आधार .....

जखमी मनाला
खळखळून वाहयचं असतं
कुठं तरी मोकळी वाट
शोधायचं असतं.  
ओघळणारे अश्रू
थांबणार नसले…
तरी...
जगायचा आधार
पेलायचं असतं.
ऊन सावलीच्या खेळात
उभारायचं असतं
आशा निराशेच्या छायेत
वावरायचं असतं.
आदर्शाच्या आधारानं
वाढायचं असतं
वर वर आकाशाला
भिडायचं असतं.
- देविदास कोरे (लातूर )
मो. नं - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

27 June 2016

देविदास कोरे यांची मराठी विषय विभागीय कार्यशाळेसाठी निवड

Devidas Kore Pasport Calar Fotho.jpg


निलंगा:-                                                                                                                        

शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  दिनांक २९ व ३० जून २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथे होण्याऱ्या दोन दिवसीय विभागीय मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातून सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे यांची निवड झाली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर जि. औरंगाबाद या संस्थेमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर मराठी विषयाची ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातून देविदास कोरे यांची निवड झाल्याबद्दल श्री. शामागीर शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीपराव धुमाळ, लातूर विभागीय मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, निलंगा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, सचिव अजय मोरे, डॉ. राजेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस. एन. शिरमाळे, संजय कदम, पी. आर. रेड्डी, एच. बी. दिवे, एस. बी. परिहार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

23 June 2016

बहूजन उद्धारक : राजर्षी शाहू महाराज



इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख'  या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही  त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी  त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व  जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्‍साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे  (लातूर)

मुख्याध्यापक

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा

ता. निलंगा  जि. लातूर

मो. - 97 30 32 5000

Email:  devidaskore21@gmail.com

22 June 2016




जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निलंगा :-
सिंदीजवळगा (ता. निलंगा) येथील जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे सर्व प्रकार केले. प्रशालेतील सहशिक्षक एच. जी. दिवे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकारा संदर्भात सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास कोरे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. या वेळी  सर्व शिक्षक वविद्यार्थी उपस्थित होते.

20 June 2016

जयहिंद विद्यालयाचा १०० टक्के निकाल

निलंगा:-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील भाग्यश्री अनिल शेळके हिने ८४.०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच दिव्या रंगराव  धुमाळ हि ८३.२० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व प्रदीप अशोक फावडे याने ७९.६० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच दत्ता भिकाजी  हराळे याला ८९ टक्के तर गीता बालाजी धुमाळ हिला ७८.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  सात , प्रथम श्रेणीत बावीस  व द्वितीय श्रेणीत सात तर तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

12 May 2016

समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी

देशाच्या विकासात आणि पायाभरणीत शिक्षणाला अनन्य  साधारण महत्व  आहे. समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षण  प्रभावी साधन आहे. म्हणून समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण सध्याचे वास्तव यापेक्षा वेगळे  असून हे चित्र दुर्देवी आहे. शिक्षणामुळे या देशातील गरिबी ,दारिद्रय कमी होईल , विषमता नाहीशी होईल असे म्हंटले  जाते. पण स्वातंत्र्यानंतरच्या  साठ वर्षानंतरही हे सध्या झाले आहे का ? उलट गरिबी व दारिद्रयात भर पडत नाही का ? ही विषमता कमी होण्याऐवजी का वाढत आहे ? हे आज पर्यंतच्या शिक्षणाचे यश आहे की अपयश ? सर्वच क्षेत्राच्या मुळाशी शिक्षण असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

  • शिक्षणातील विषमता चिंताजनक:
     सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करणे बंधनकारक आहे. त्या नुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तशी सोय व कायदाही केला आहे.  वरील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यावर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. या दृष्टीने शासनाचे व्यापक प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीची विषम स्थिती दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे.समाजातील सर्वच घटकांचा समान विकास घडून येण्यासाठी समान व सारख्या शाळातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. पण सध्याच्या शिक्षणात यापेक्षा वेगळे चित्र आढळते. सर्वसाधारण पणे शहरातील नगरपरिषदा , महनगरपालिकांच्या शाळांत दीनदलित , मजूर ,कामगार व गरिबांची मुले शिकताना आढळतात. तर ग्रामीण भागात शेतकरी , शेतमजुरांची मुले जिल्हापरीषदांच्या शाळांत बहुसखेने शिकताना दिसून येतात.शैक्षणिक वातावरणा आभावी दारिद्रय व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. बिकट परिस्थितीमुळे ते महागड्या खाजगी शाळात , शहरात  जाऊन शिकू शकत नाहीत. त्यांना शिकवणी वर्ग लावणे ही शक्य होत नाही. याउलट धनिकांची मुल सर्व प्रकारच्या सुविधा असणाऱ्या शाळांत देणग्या देवून शिकताना आढळतात .त्यांना शिकवणी वर्ग  , शैक्षणिक साधने व सुख सुविधा आसतात. म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. डॉक्टर ,  इंजिनियर , वकील , प्राध्यापक व अन्य क्षेत्रात ते पुढे असतात. या स्पर्धेत काही अपवाद वगळता सर्वसामान्य गोरगरिबांची मुले तग धरू शकत नाहीत. त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर धनिक अधिक धनिक बनतो. आणि विषमता कमी होण्या ऐवजी वाढते. म्हणून शिक्षणातील विषमता थांबवून समाजातील सर्व घटकांना समान व एकसारखे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
  • शहरी व ग्रामीण  भागातील दरी कमी व्हावी:
     शहरी  व ग्रामीण भागातील शिक्षणात काही प्रमाणात फरक दिसून येतो. शहरी भागात दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक सुविधाही असतात. शिकवणीवर्गाची ही  सोय  असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा कल शहरी भागाकडे वाढताना दिसून येतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काही शाळा पुढे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत , तर काही शाळा मुला अभावी ओस पडत आहेत. खेड्यातील शाळांना मुलांचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांची मनधरणी  करून शिक्षकांना मुलांची जमवा जमवी करावी लागत आहे. आशी स्थिती का ? निर्माण होत आहे. याचे आत्मपरीक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी करणे आवशक आहे.शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी अधिक जागरूक पणे लक्ष देताना दिसून येतात. त्यांना शैक्षणिक सुविधा व  साधणे ही पुरविली जतात. मुलांच्या अभ्यासाकडे  लक्ष्य दिले जाते. पण खेड्यात मात्र या पेक्षा वेगळी स्थिती आढळते. खेड्यातील पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फारसे जागरूक दिसत नाहीत.मुलांत ही शिक्षणाविषयी गांभीर्य आढळत नाही. शहरांच्या तुलनेत शैक्षणिक सुविधांचा ही आभाव जाणवतो. खाजगी शिकवणीवर्ग ही  नसतात. बरयाचदा पालक मुलामुलींना घरगुती व मजूराअभावी  शेतातील कामे लावताना दिसून येतात. त्यामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी होते. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही कच्चा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व निकाल खालावताना आढळतो.पालकांची मुलांच्या शिक्षणाविषयी असणारी उदासिनता. व शिक्षणाकडे पहाण्याची मानसिकता तसेच बहुसंख्य पालकांचा आडणीपणा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न व समस्या  निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात शिक्षणात तफावत व फरक दिसून येतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच पालकांचा शहराकडे शिक्षणासाठी वाढणारा कल कांही अंशी कमी होईल. देशातील वाढती गरिबी व विषमता कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना , तळागाळातील दीनदलित कामगार व गोरगरीबांच्या मुलामुलींना सारख्या व समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरच समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सारख्या प्रमाणात विकास होऊ शकेल व शैक्षणिक विषमता कमी होण्यास मदत होईल.
- देविदास कोरे  (लातूर)
मो. न - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gamil.com.