करोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात संवेदनशील भागात लॉकडाऊन असून जनजीवन ठप्प झाले आहे. नेमक्या याच स्थितीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने १० जुलै २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे खळबळ उडाली आहे. या अधिसूचनेत एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या अंशतः अनुदानित, विना-अनुदानित शिक्षकांच्या तोंडचा जुन्या पेन्शन योजनेचा घास हिरावून घेण्याचा डाव आखल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे एक नोव्हेंबर २००५ पूर्वी आठ ते दहा वर्ष बिनपगारी अध्यापनाचे इमाने-इतबारे काम केलेल्या राज्यातील सुमारे दीड ते दोन लाख शिक्षकांच्या न्याय्य हक्काची असलेली जुनी पेन्शन योजना डावलण्याचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे राज्यातील आशा अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्या मध्ये प्रचंड खळबळ उडाली असून आक्रोश निर्माण होत आहे.
१० जुलै २०२० रोजी काढलेली ही अधिसूचना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील मसुद्द्याला बदलण्याची असल्याने ती शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. ही अन्ययाग्रस्त अधिसूचना गेल्या १५ वर्षांपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब विसंगत व न्याय्य तत्वाला हरताळ फासणारी आहे. या अधिसूचनेद्वारे अनुदानित शाळांची व्याख्या बदलून १०० टक्के अनुदान असलेल्या शाळांचाच अनुदानित शाळांच्या व्याख्येत समावेश करण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
विना अनुदानित शाळा व अंशतः अनुदानित शाळांना यातून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे आठ ते दहा वर्ष विना अनुदान तत्वावर अध्यापनाचे काम करून टप्पा अनुदानावर आलेल्या तसेच विना अनुदानित व अंशतः अनुदानित तुकड्यांवर काम करून टप्पा अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या न्याय्य हक्का पासून वंचित ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे दीड ते दोन लाख कर्मचाऱ्यांना जुन्या पेंन्शन योजनेतून बाहेर काढण्याचा डाव आखला जात असल्याने शिक्षक कार्मचाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा व विधान परिषदेच्या अधिवेशनात ही हा प्रश्न ऐरणीवर घेण्यात आला होता. या सर्व घटनां व पार्श्वभूमी ची दखल घेत मा. सभापती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे २६ जून २०१९ रोजी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशत अनुदानित व तुकड्यांवर एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी २४ जुलै २०१९ रोजी शिक्षण विभाग, वित्त विभाग, विधी व न्याय विभाग यांच्या सचिवांची एक संयुक्त समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या समितीला तीन महिन्यांच्या आत अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले होते. पण एक वर्ष झाले तरी ही या समितीने अद्याप आपला अहवाल दिलेला नाही. त्यामुळे समितीचा कार्यकाळ वाढवून तो ३१ जुलै २०२० पर्यंत करण्यात आला आहे. परंतू या समितीचा अहवाल येऊन त्यावर अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते पण त्या आगोदरच घाई गडबडीने शालेय शिक्षण विभागाने १० जुलै २०२० रोजी अन्यायकारक अधिसूचना काढली आहे. व त्या आधारे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ मधील मसुदा बदलण्याचा घाट घातला असून तो शिकांची जुनी पेन्शन हिरावून घेणारा आहे.
शिक्षक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना काढून घेण्याची ही बाबा सारासार दृष्टीने निषेधार्य आहे. या संदर्भात राज्यातील शिक्षक आमदारांनी ही अन्यायकारक अधिसूचना मागे घेण्याची मागणी केलेली आहे. जुन्या पेन्शन योजने पासून डावलण्यात येत असलेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन ही अधिसूचना रद्द करून शिक्षकांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी होत आहे.
देविदास कोरे (लातूर)
मो - ९७३०३२५०००
Email: devidaskore21@gmail.com

