इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख' या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे (लातूर)

खूप छान
ReplyDeleteधन्यवाद !
Delete