आवकाळी गारपिटीच्या जबर तडाख्याने मराठवाडयातील शेतकरी हवालदिल झाला असून निसर्गाच्या भीषण प्रकोपाने तो देशोधडीला लागला आहे. बिगर मोसमी आवकाळी पाऊस व गारपिटीच्या भीषण तांडवाने गेल्या आठ दहा दिवसापासून कहर केला असून लातूरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना निसर्गाच्या या भयानक प्रकोपाचा जबर फटका बसला आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपिटीने कधी नव्हे एवढी भयानक हानी झाली असून शेतकऱ्यांचे जीवन पुरते उध्वस्त झाले आहे. रबी पिकांची पुरती नासाडी होऊन ती जमीनदोस्त झाली आहेत. फळबागा झडून व फळे सडून गेली आहेत. आंब्यांचा मोहोर पुरता झडला आहे. ऊस भूईसपाट झाला आहे. तोडणी होऊन फुटवा झालेल्या ऊसाची पाने पूर्णपणे झडून केस विनचरल्यासारखी झाली आहेत. हातातोंडला आलेली रबी ज्वारी, गहू, करडा, वटाणा, हरभरा, आदी पिके गारपिटीच्या जबर तडाख्याने मातीत गेली आहेत. विजेची खांबे व झाडे उन्मळून पडली आहेत.
शेतातील कडब्याच्या गंजी वादळी वाऱ्याने अस्ताव्यस्त उडून जाऊन भिजल्या असून कडबा जनावरांकरिता खाण्या योग्य राहिला नसल्याने चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचा आसरा नाहीसा झाला आहे. पशुधानाचीही जबर हानी झाली आहे. घरावरील पत्रे उडून गेली आहेत. मराठवाड्यात सुमारे आठ लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीशेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आसला तरी ही प्रचंड हानी व नासाडी सार्वत्रीक आहे त्यामुळे निश्चित आकडेवारी आणि नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे. वादळी वारे व आवकाळी पावसाचा कहर सुरूच असून शेतकरी भेदरलेल्या व धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.
पोटच्या पोरासारखं मोठ्या कष्टानं जपलेल्या पिकांची ही भयानक नासाडी पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. गेल्या आठ दहा दिवसातच होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्यावर खूप मोठे आस्मानी संकट कोसळले असून निसर्गाच्या या भीषण तांडवाने शेतकऱ्यांचे जीवनच गारद केले आहे.पण नेतेमंडळी मात्र लोकसभेच्या जागावाटप व निवडणुकीच्या रणधुमाळीत पुरते व्यस्त असल्याचे दिसत आहे.
सत्ता प्राप्तीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कांही नेतेमंडळीना आता जाग आली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या आश्रुवर मतांची पोळी भाजण्याचा कुटील डाव आखला जाण्याची शक्यताही आहे. गारपिटग्रस्त भागाच्या पाहणीचे आता दवरे आखले जात आहेत. राज्यावर एवढी भीषण आपत्ती वोढवून आठ दहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दवरयासाठी वेळ मिळाला आहे
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून कमालीचा आक्रोश सुरु आहे पण सुस्तावलेल्या मायबाप सरकारच्या कानावर अद्याप हा टाहो पोहंचला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.निवडणूक कामात गुंतलेली सुस्त व मस्तवाल यंत्रणा आठ दहा दिवस उलटल्या नंतरही पंचनामे करण्याच्याच नवटंकित मश्गुल असल्याचे चित्र आहे. वास्तविक हे आतोनात झालेली हानी सार्वत्रिक असताना हाताचा कंकणाला आरशाची गरजच काय ? खुलेआम या प्रचंड आपत्तीची झळ सर्वच शेतकऱ्यांना बसल्याचे वास्तविक चित्र सर्वत्र आहे. मग असे असतानाही पंचनाम्याचा देखावा करून वेळकाढूपणा केला जात असल्याने शेतकऱ्यांत कमालीची खदखद व उद्वेगाच्या भावना उमटत आहेत. आम्हाला कोणी वाली आहे का ? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
निवडणूकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या झालेल्या या वताहाती कडे कमालीचे दुर्लक्ष्य होत असल्याची भावना बळावत चालली आहे. संप मोर्चे काढणाऱ्या कार्मच्यारांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणारे सरकार शेतकऱ्यांची फरफट करत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही भीषण आपत्ती ओढवून आठ दहा दिवस उलटले तरी ही वस्तुस्थिती तातडीने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची व्यवस्था का करता येऊ शकली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वेळेवर मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आस लाऊन बसले आहेत.
अवकाळी गारपिटीच्या पावसाने हतबल होऊन रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांना वेळ निघून गेल्यावर मदत मिळण्यापेक्षा ती तातडीने त्यांच्या पदरात पडणे आवश्यक आहे. पण निवडणूक आयोगाची परवानगी व आचारसंहितेचा बाऊ करून वेळकाढूपणा सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वास्तविक पहाता मेटाकुटीला आलेल्या व भीषण परस्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट वीज बील, पिक कर्ज माफी व भरीव आर्थिक मदत त्वरीत देऊन दिलासा देणे व कोसळलेल्या या आपतीतीतून त्यांना बाहेर काढणे सध्याच्या परस्थितीत गरजेचे आहे.
- देविदास कोरे ( लातूर )
मो. नं. 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.