पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

18 November 2016

शिक्षकांच्या मानगुटीवर सेल्फीचा खुळ खुळा

लीकडे शिक्षण क्षेत्रात दिवसागणिक नव नवीन प्रयोग सुरू आहेत. ते आता शिक्षकांच्याही अंगवळणी पडत आहेत. एखाद्या दिवशी शिक्षण खात्याचा नवीन नियम वाचण्यात आला नाही अथवा कानावर पडला नाही तर शिक्षकांना ओशाळल्यासारखे होऊन आज कालचा जुनाच दिवस आहे की काय ? असा भाबडा भ्रम होतो ! ही सध्याच्या शिक्षणक्षेत्रातील वास्तविकता आहे. ती कशी नाकारता येईल ?
शिक्षणाच्या आयचा घो होय ! आता असे म्हणायचीच स्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाली आहे. तीन नोव्हेंबर २०१६
रोजी स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या वर्गातील मुलांची उपस्थिती पडताळण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलांचे दहा दहा चे गट करून त्यांची सेल्फी काढावी. या सेल्फी मध्ये असलेल्या मुलांची नावे आणि आधार क्रमांकासह हे सेल्फी फोटो शिक्षण खात्याच्या सरल वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायवे. असे निर्देश या शासनादेशात देण्यात आले आहेत.
राज्यातील कांही शाळांमध्ये दोन हजारांपेक्क्षाही अधिक विध्यार्थी संख्या आहे. दहा दहा च्या गटात वर्ग शिक्षकांने मुलांसोबत सेल्फी काढायची म्हंटले तर दिवस तरी पुरेल का ? हे काढलेले सेल्फीचे फोटो ऑनलाईन अपलोड कराचे ! खेड्यापाड्यातील किती शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहेत? जलदगती इंटरनेट ची सुविधा वस्ती, पाडे, तांडे व खेड्यातील शाळांमध्ये आहे का ? कांही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत तर बहुतांश शाळांत पुरेशा संख्येत शिक्षक नाहीत. या वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता शिक्षण खात्याने  अफलातून निर्णय घेवून शिक्षकांच्या हाती मात्र सेल्फीचा खुळ खुळा दिला आहे. आता दीपावली सुट्ट्या संपून जिल्याहातील शाळा २१ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. खेड्यातील शाळांमध्ये सुरवातीचे तीन चार दिवस मुलांची उपस्थिती नगण्य असते. सुरवातीच्या आठवड्यात शाळेचे तोंड न पाहणाऱ्या मुलांना शाळेत आणून सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ निर्माण झाली आहे.
शिक्षकांची नेमणूक नेमकी कशासाठी आहे ? असा प्रश्न आता प्रामुख्याने निर्माण झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून ही व अशीच अन्य कामे करायची का ? वर्गात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले कशी शिकतील ? ती प्रगत होतील का ? शिक्षकांना आशा कामात जर गुंतवून ठेवले तर शाळा कशा प्रगत होतील ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून हा निर्णय अव्यवहार्य असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू गुंडाळून ठेवून वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता सेल्फी सारखे निर्णय होत असतील तर ही खेदाची बाब आहे.
देविदास कोरे
(लेखक, जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथे मुख्याध्यापक आहेत.)
पूर्व प्रसिद्धी -  दै. ‘पुण्यनगरी’ दि. १७ नोव्हें २०१६

No comments:

Post a Comment