गेल्या दोन आडीच वर्षापासून महागाई सतत वाढत आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे असाह्य होत आहे. गोरगरीबानी जगावे कसे ? हा जीवघेणा प्रश्न बनत आहे. वाढत्या महागाईमुळे लोक हतबल होत आहेत. आगोदरच महागाईच्या झळा सोसून हयराण झालेल्या मध्यमवर्गीय जनतेसमोर पुन्हा एकदा महागाईचा आगडोंब भडकण्याची चिन्हे सतत जाणवत आहेत.
अलीकडेच कांही दिवसापूर्वी पेट्रोल, डीझेल व घरगुती वापराच्या ग्यासच्या दारात वाढ झालेली आहे. वर्चेवर त्यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे आगोदरच वाढत्या महगाईला तोंड देत जगत असलेल्या जनतेला सतत वाढणाऱ्या महागाईला तोंड देत जगणे असाह्य होत आहे. महगाईने त्रासून गेलेल्या जनतेत कॉंग्रेस युपिए सरकारविषयी प्रचंड नाराजी व रोष निर्माण होत आहे.वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकार का अपयशी ठरत आहे ? महागाई कमी होण्या ऐवजी त्यात आणखी का भर पडत आहे ? याला सरकारची धोरणेच कारणीभूत नाहीत का ? वाढत्या महागाईच्या झळा जनतेनी किती सहन करायच्या ? असे भयावह प्रश्न निर्माण होत आहेत.
भारत पेट्रोलियम , हिंदुस्तान पेट्रोलियम , इंडियन ऑईल या देशातील प्रमुख तेल कंपन्या अधूनमधून तेलाच्या दरात दरात वाढ करत असतात. त्यामुळे त्याचा देनंदिन व्यवहारावर परिणाम होवून अन्य जीवना- वश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. महागाईत भर पडून पुन्हा हा आलेख वाढतच आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागून महागाईचे चटके बसत आहेत. हि खेदाची बाब आह.
आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या कांही काळापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे परिणामतः कच्या तेलाचे दर स्थिर नाहीत. त्यात सतत चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम इंधन दर वाढीत होत आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. इराण हा कच्या तेलाचा प्रमुख पुरवठादार देश आहे. भारत एकूण तेलाच्या साधारणतः बारा टक्के कच्चे तेल इराण कडून आयात करतो. जर इराणने कच्या तेलाचे दर आणखी वाढवले तर इंधन दरवाढ अटळ ठरू शकते. असे झाले तर मध्यमवर्गीय जनतेला पुन्हा वाढत्या महागाईचे चटके सहन करावे लागणार असून ते कठीण जाणार आहे. आगोदरच महागाईने हयराण झालेली जनता आणखी हतबल होऊन खिशाला बसणारा हा चाट सहन करू शकणार नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाढत्या महागाईने आता मर्यादा ओलांडली आहे. त्यात आणखी भर पडल्यास सामान्य जनतेला ते असाह्य होणार आहे. म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वेळीच त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्याची आवश्यकता प्राकर्षाने निर्माण झाली आहे.
- देविदास कोरे ( लातूर )
मो. 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com